Sunday, June 23, 2024

आणि आईस्क्रीम खाली पडली

आणि आईस्क्रीम खाली पडली




शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी नवी मुंबईला स्टेट बँकेत कामाला लागलो. घरापासून ऑफिसला जाण्यासाठी मला ऑटो, बस आणि ट्रेन या तीन साधनांचा उपयोग करावा लागत असे. साधारणता दोन अडीच तास लागत होते पोहोचण्यासाठी. दररोजचा प्रवास असल्यामुळे लोकलमध्ये माझे बरेच मित्र झाले होते, काहींची मैत्री एवढी झाली होती की जणू काही ते आता माझे परिवारातील सदस्यच वाटत होते. त्यामुळे सकाळी आम्ही जाताना आणि संध्याकाळी घरी येताना सर्व सोबतच असायचो. प्रत्येक जण आपापल्या कौटुंबिक गोष्टी माझ्यासोबत शेअर करायचा, मी पण त्यांना माझ्या सुखदुःखाच्या गोष्टी सांगत असायचो. असेच वर्षानुवर्ष चालली होती बाबांच्या जागेवर मी कामाला लागल्यामुळे आयुष्यात थोडी स्थिरता आली होती. माझ्यासोबत कामाला जाण्यासाठी एका कंपनीमध्ये कामाला असलेला प्रभाकर हा माझा मित्र झाला होता. त्याची आणि माझी चांगली मैत्री जमली होती. आम्ही दोघं जातानी येतानी खूप गप्पा मारायचं सकाळी साधारणतः आम्ही आठ वाजता घरातून बाहेर पडायचो आणि संध्याकाळी घरी येण्यासाठी आम्हाला आठ वाजत असे. म्हणजे आम्ही फक्त घरी जेवण आणि झोपण्यासाठी जात होतो. प्रभाकर त्याच्या दैनंदिन आयुष्यातल्या सर्व गोष्टी सांगायचा कामाचा त्याच्यावरती असलेला तणाव, कौटुंबिक जबाबदारी, मुलांचे शिक्षण, आर्थिक अस्थिरता यामुळे तो कंटाळून गेला होता‌. परंतु या परिस्थितीतही न डगमगता तो स्थिरपणे उभे राहण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे तो कंपनीत जॉब करूनही लोकल ट्रेनमधून ज्यावेळेस आम्ही सोबत असायचो त्यावेळेस तो ट्रेनमध्ये स्टेशनरी विकत असायचा. त्याच्यासोबत बॅगेमध्ये स्टेशनरी सामान नेहमी असायचं. तर मी त्याला विचारायचं की असं 5-10 रुपये कमवून तुझं भागत का रे? तर तो मला म्हणायचा की "इथून संध्याकाळी घरी गेल्यानंतरही, जेवण करून मी पत्नीच्या कामामध्ये मदत करतो". तो एका चाळीमध्ये राहत होता आणि माझ्या उतरण्याचे स्टॉप पासून त्याचं घर काही अंतरावर होतं. साधारणत पाऊण तास त्याला घरी जाण्यासाठी लागत असेल. त्याची बायको ही शिलाई मशीनवर कपडे शिवण्याचे काम करत असायची. मुलं साधारणता दहा वर्षाची असेल. त्यादिवशी ऑटोमधून उतरून ट्रेनची वाट बघत मी तिथे थांबलो होतो, आणि तेवढ्यात प्रभाकर आला मला म्हणाला, "अरे आज पण तेच झालं जेवायला वेळच भेटला नाही", त्यावर मी ओरडलो, "अरे काम किती असलं तरी जेवणाला प्रायोरिटी दिली पाहिजे". त्यावर तो बोलला की, "मालक रागावला होता त्यांनी अर्जंट काम मागितले होते ते पूर्ण करून देण्यामध्ये वेळ एवढा गेला की नंतर जेवणाची वासनाच उरली नाही". मग आम्ही दोघांनी सोबत पॅटीस खाल्ले आणि मग आम्ही घरी गेलो. तो नेहमी चिंताग्रस्त असायचा त्याविषयी त्याला जर विचारलं तर तो नेहमी बोलायचा की, "माझ्या एकट्यावर घराची जबाबदारी आहे, आई वडील दोघेही आजारी असतात, मुलांचे शिक्षण, बायको कशी तरी संसाराला मदत करत आहे पण ती बिचारी कधी माझ्याकडे एक रुपयाचीही अपेक्षा करत नाही. सर्व घर खर्च ते स्वतः चालवते. आणि माझ्या तटपुंजा पगारामध्ये मी माझं कुटुंब कसं चालवू." आपल्या पुरुषांचा आयुष्य असंच असतं आपल्याला कधीच मोकळे बोलता येत नाही, एखादी गोष्ट हवी असेल तर मागता येत नाही, कोणासमोर रडताही येत नाही किंवा हट्ट ही करता येत नाही, कदाचित यालाच प्रौढत्व व म्हणत असेल. "खरं सांगू आपलं बालपणच छान होतं, विनाकारण आपण मोठे झालो". नेहमी चिंताग्रस्त असल्यामुळे कदाचित त्याच्या शारीरिक स्थितीवर ही परिणाम झाला होता. मी कामावरून घरी आल्यानंतर माझं जे जीवन स्थिर चाललेल आहे, हे बघून मला कुतूहलता वाटत असे, की समाजामध्ये असलेल्या दुःखाची तुलना करता आपण किती आरामदायी जीवन अनुभवत आहे. असंच एक दिवस आम्ही स्टेशनवर ट्रेन ची वाट बघत उभे होतो आणि तेवढ्यात तिकडून गर्दी मधून पळत पळत प्रभाकर आला त्याच्या हातामध्ये आईस्क्रीम कोन होता. मी त्याला म्हटलं, "अरे बाबा लहान राहिला का तू आता आईस्क्रीम खायला". तर त्याने आईस्क्रीमचा एक घास खाल्ला आणि म्हटला की, "अरे बाबा आज काय सांगतो धावपळ, आज मालकाने जाम घाम काढलाय". अरे आमचा मालक असा आहे की तो बरोबर ऑफिस सुटण्याची वेळ झाली की, मग आम्हाला काम सांगतो आणि त्यामुळे माझा बाहेर निघण्याचा वेळ हा नेहमी मागे पुढे होत असतो. आणि आज त्याने मला जेवणाची सुट्टीच दिली नाही, तसाच बसलो मी मग काय म्हटलं आता घरी जाईपर्यंत भूक भागवण्यासाठी आईस्क्रीम खाऊ, तेवढीच एनर्जी भेटेल". दुसऱ्य दिवशी संध्याकाळी आम्ही सर्व स्टेशनवर जमलेलं असताना प्रभाकर आज लवकर आलेलो होत आणि तो बेंचवर बसला होता आज पण हातामध्ये आईस्क्रीम होती, पण तो काहीच बोलत नव्हता. आणि आईस्क्रीम खातही नव्हता. आईस्क्रीम वितळत चालली होती. खाली रेल्वे स्टेशनवर बसवलेल्या लादीकडे तो एकटक बघत होता. आईस्क्रीमचे ओघळ त्याच्या हातावरती आले होते. त्याची पापणीही हालत नव्हती. शेजारी त्याची बॅग होती जराशी जड वाटत होती मला वाटलं की दररोज त्याच स्टेशनरीचे सामान असतं विकण्यासाठीच ते असेल त्याच्यामध्ये, तेवढ्यात ट्रेन आली सर्व गर्दीचा लोंढा हा ट्रेन कडे वळायला लागला, त्याला म्हटलं चल रे प्रभा ट्रेन आली‌. त्याने कोणताही होकार नकार दिला नाही. मी त्याला हात लावला तर प्रभाकर तिथेच बेंचवर कोसळला आणि त्याच्या हातातील आईस्क्रीम खाली पडली. नंतर त्याला उचलून हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी प्रयत्न केला परंतु डॉक्टरांनी सांगितले की याचा मृत्यू झालेला होता, कदाचित हार्ट अटॅक मुळे. त्याच्या घरी मृतदेह सुपूर्द करून अंत्यविधी झाल्यानंतर माझ्या लक्षात आले की प्रभाकर ची बॅग तर माझ्याकडेच आहे अजून त्याच्या बॅगेला हात लावल्यानंतर जाणवले की जड लागते, तर बघितलं की त्याचा टिफिन त्यामध्ये तसाच होता त्याने दिवसभर जेवण केले नव्हते. कदाचित त्यासाठीच त्यांनी आईस्क्रीम घेतलेलं असावं, परंतु खाण्याअगोदरच ते खाली पडलं. रात्रभर त्याच्या निरागस मुलांचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर घोंगावत होता.

Sunday, June 9, 2024

ती


गावाच्या बाहेर फाटलेल्या छपराचं तिचं घर होतं, नवऱ्याच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी तिला वाळीत टाकून दिलं होतं. त्यादिवशी तिचा बाप तिच्या घरी आला होता आणि घराच्या बाहेर येऊन लोकांना मोठ्याने शिव्या देत होता, तो म्हणत होता की मला माहिती तुझा नवरा कसा मेला, घरगडी असलेल्या तुझ्या नवऱ्याला त्याच्या मालकाने मारले. अचानक ती म्हणते दादा थांबा, माझा नवरा कसा मेला हे मला माहितीय. लग्न करताना एवढा विचार नाही केला, मग आता कशाला एवढा विचार करताय, मी तुमच्यासोबत येणार नाही. मला माझ्या नशिबावर सोडून द्या. तिचा बाप म्हणतो,"अग बाई तू या दहा वर्षाच्या मुलाला घेऊन कशी राहणाऱ्या या फाटक्या घरात, परत चल माझ्यासोबत आपण जाऊ आपल्या गावाला.तिथेच राहू. अग तू एवढी एवढी असताना तुझी आई मला सोडून गेली, एका मुलीला काय पाहिजे असते मला कसं कळणार, आता तू हे लहान मुल आणि पोटात वाढणार पोरग घेऊन या फाटक्या छपरात कशी राहणार, चल". ती म्हणते,"नाही दादा, मला माझ्या नशिबावर सोडून द्या आणि तुम्ही या आता".

बाप गेल्यावर अनुराधा तिच्या दहा वर्षाच्या मुलाला म्हणते की, सोनू मला मदत करू लाग आपल्याला छप्पर झाकायचे. तेव्हा तिचा मुलगा म्हणतो की,"आई आपण आजोबांसोबत घरी का नाही गेलो". तेव्हा ती म्हणते, "अरे, बाबा दुसऱ्याच्या घरी सालगडी आहे त्याला त्याचाच पोट भरता भरता अवघड जातं मी कुठे त्याच्यावर ओझ बसू, शेवटी मुलगी हे परक्याचे धन असते. मला माझ्या बापाच्या डोक्यावरती ओझ नाही राहायचं आयुष्यभर".

आठवडाभर दोघं डोंगर रानातून लाकडं गोळा करून पालापाचोळा गोळा करून घराचे छप्पर कसे बस झाकतात. अनुराधा गर्भवती असते तरी घर चालवण्यासाठी पोटापाण्यासाठी ती काम करत असते. गवताची ओझी करून विकत असे, गवंड्याच्या हाताखाली कामाला जात असे, लाकुड तोडून विकत असे. सकाळी लाकुड तोडण्यासाठी गेलेली अनुराधा घरी येता येता संध्याकाळ व्हायची तेव्हा तिला एका मनाचे 50 पैसे भेटत होते त्यातून ती तिच्या मुलासाठी, खाण्यासाठी, उदरनिर्वाह करत होते. एकदा ती आजारी होती,खूप ताप आला होता तिला आणि काम करू शकत नव्हती त्यावेळेस खाण्यासाठी काही नव्हते म्हणून ती मुलाला घेऊन नदीतील मासे पकडायला उतरली.अंगात पारा वाढेल एवढा ताप पण पोटच्या मुलाचं पोट रिकामा त्यामुळे ती मासे पकडण्यासाठी पाण्यात उतरली आणि अचानक तिचा पाय घसरला, पण परत स्वतःला सावरत ती बुडता बुडता वाचली आणि किनाऱ्यावर आली. परंतु तिला मासा भेटला नाही. ती रात्र ती आणि तिचा मुलगा हे दोघेही उपाशी झोपले. सकाळी उठले तर अनुराधाने मुलाला मालकाच्या घरी पीठ मागण्यासाठी पाठवले. तर मालकिन बाईने रात्रीच्या चपात्या त्याला दिल्या. घरी आल्यानंतर तिच्या मुलाने आणि तिने त्या चपात्या घरात भाजी नसल्यामुळे पाण्यात ओल्या करून खाल्ल्या. असेच दिवस काढत काढत अनुराधाच्या पोटातील बाळ हळूहळू वाढू लागले. त्या रात्री अनुराधा आणि तिचा मुलगा सोनू हे दोघेही टेकडीच्या कठाडावर बसले होते आणि दुरून मंदिराजवळ चाललेल्या कीर्तन बघत होते. त्यावेळेस तिचा मुलगा म्हणतो की, "आई आपण कीर्तन जवळ जाऊन का नाही बघत?" तर मुलाला गावातील लोकांची असलेली मानसिकता आणि जातीव्यवस्था सांगण्यापेक्षा अनुराधा सांगते की, "अरे देव आपल्याला त्या मंदिरातूनच बघत आहे, त्याच्यामुळे आपल्याला तिकडे जाण्याची गरज नाही". कीर्तन संपता संपता रात्रीचे साडेअकरा वाजले होते आणि अचानक तिच्या पोटातील वेदना असह्य होऊ लागल्या, तिला कळा येऊ लागल्या, ती घरात गेली आणि जमिनीवर बसली त्या वेदना इतक्या असह्य होत्या की, तिचा मुलगा रडायला लागला. आई...... आई..... तर तिने तिच्या मुलाला बाजूने साडी लावण्यासाठी सांगितले आणि गावातून रखमा आजीला बोलून आण असं म्हटले. दहा वर्षाचा तिचा मुलगा सोनू हा रडत रडत अंधारात घाबरत परंतु धाडस करत पळत सुटला आणि रखमा आईच्या घरी पोहोचला. पण तिचा दारुडा नवरा तिला मारझोड करत होता. सोनू म्हटला, "आजी, आई खूप मोठ मोठ्याने रडते, तिचं पोट दुखतंय तू चल ना घरी.... आईने बोलावलं....चल‌ना तू लवकर...." तो‌ रडत होता. रखमा नवऱ्याला आडून सोनूला पुढे जायला सांगते. घरी जाणाऱ्या सोनू अचानक मंदिरासमोर थांबून हात जोडतो आणि आई बरी व्हावी म्हणून देवाकडे प्रार्थना करू लागतो, पण तेवढ्यात एक म्हातारा त्याला तिथून हाकलून लावतो. तो तसाच रडत...पळत.....हळूहळू धाडस करत घरापर्यंत अंधारातून पोहचतो. तोपर्यंत आईच्या वेदना अत्यंत असह्य झालेले असत्या, आणि सोनू रडत असतो दोघांसाठीही ही काळ रात्र खूप मोठी होती, आणि पहाट होता होता अनुराधा बाळाला एक जन्म देते. आणि सोनुला बाहेरून वीळा आणायला सांगते. अनुराधा त्यावेळी नाळ कापते अशक्त झालेले ती, उठणे बसू शकत नव्हती, जन्माला आलेले ते मुल अजून काही बोलत नव्हते तरी ती त्याला बोलण्याचा प्रयत्न करत होते दिवस उजेडतो तिच्या अंगातील अशक्तपणा दिसत होता परंतु त्या बाळाची कोणतीही हालचाल न झाल्यामुळे तिचा हंबरडा फुटतो आणि ते मुल मृत असतं....... काही वेळानंतर सोनू आणि अनुराधा हे दोघेही आकस्त होऊन एकमेकांच्या गळ्यात पडून रडता आणि ती सोनूला टेकडीवर एक छोटा खड्डा खोदण्यासाठी सांगते आणि त्यात त्या लहान मुलाला पुरून दोघेही पुन्हा आपल्या घरी परतता. रखमाआजी घरी येते तिच्या हाताला पट्टी बांधलेली असते, नवऱ्याने तिचा हात मोडलेला असतो, ती पण अनुराधा चा गळ्यात पडून रडू लागते, परंतु जवळ बसलेल्या सोनू हा निशब्द होऊन डोळ्यातून अश्रू वाहत असतात व मनात काहूर माजलेले असते. अनुराधाच्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या मृत्यूने ती

घायाळ झालेली असते आणि अचानक ती उंबऱ्यात जमिनीवरती कोसळते. रखमाआजी आणि सोनू हे दोघेही तिला उठवण्याचा प्रयत्न करतात...... मोठ्याने ओरडतात....... लहान सोनू तिचा हात हलवून तिच्या चेहऱ्याला हात लावून..... आई..... उठ..... आई......उठ.... माझ्याशी बोल....... म्हणून मोठ्या मोठ्याने रडू लागतोय...... आणि अनुराधाचा मृत्यू झालेला असतो. वाळीत टाकलेल्या त्या घरात अनुराधाचा मृत्यू झाल्याने तिचा मुलगा सोनूच्या पायाखालची जमीनच सरकते.

-एक_संकेत

Saturday, June 8, 2024

अँड्रॉइड जनरेशन

अँड्रॉइड जनरेशन

सध्याच्या युगामध्ये साधारणता 2000 सालानंतर जन्माला आलेले सर्व बालक हे अँड्रॉइड जनरेशन मध्ये येतात. या जनरेशनच्या मुलांमध्ये आपल्याला टेक्नॉलॉजीशी रिलेटेड असलेले आकर्षण दिसून येते, त्या पश्चात पाठीमागे राहिलेली शेवटची पिढी 2000 सालाच्या अगोदर जन्मलेले की ज्यांना आपण वाय जनरेशन असे म्हणतो आणि दुसरे म्हणजे झेड जनरेशन की, ज्या जनरेशनच्या मुलांमध्ये आपल्याला संस्कार नावाची ही गोष्ट शेवटची दिसून येते. तसेच या अँड्रॉइड जनरेशनच्या मुलांमध्ये आपल्याला संस्कार नावाची गोष्ट प्रादुर्भावाने आढळल्यास मिळते. एकापेक्षा जास्त लाइफ पार्टनर असणे ही तर सध्या तरुणांमध्ये वाढत चाललेली क्रेझ आहे. कपड्यांमध्ये आलेली विविधता यावरून असे समजते की स्त्रिया या पूर्णतः पुरुषांच्या कपड्यावरती विसंबून आहे, परंतु पुरुष हे स्त्रियांचे कपडे अजून परिधान करू शकले नाही. तर संभोग ही एक प्रक्रिया नसून, एक दैनंदिन क्रिया आहे असा या व्यक्तींचा संभ्रम निर्माण झाला आहे(असं त्यांना कदाचित वाटत असेल). सध्याची मुलं ही जास्त प्रमाणात हट्टी झालेली आहे. आई-वडिलांचे कदाचित त्यांच्यावरती दुर्लक्ष झाले असे म्हणावे लागेल. परंतु हे मुलं त्यांच्या आई-वडिलांचे ही ऐकत नाही आणि शिस्तीच्या बाबतीत या ठिकाणी पालकांचा समतोल ढासळलेला दिसतो. या इन्स्टंट जनरेशनच्या मुलांना सर्व काही तात्काळ पाहिजे असते, म्हणजे की पिझ्झा अर्ध्या तासांमध्ये, व्हिडिओ पंधरा सेकंदामध्ये त्यामुळे त्यांची भविष्याप्रती असलेली ओढ ही चिंताजनक बनलेली आपल्याला आढळल्यास मिळते. याउलट आपण जर युरोपियन, अमेरिकन देशांमधील मुला-मुलींचे उदाहरणे घेतले तर तेथील मुलं हे पेट्रोल पंप, पिझ्झा डिलिव्हरी, गार्डनिंग, हात गाडीवरील फास्ट फुडचे दुकान, तसेच दिवसभरातील सर्व कष्टाची कामे हे आवडीने करतात आणि स्वतःचा खर्च भागवतात. त्या देशातील मुले हे आपल्या शिक्षणाचा खर्च स्वतःच उचलतात तर पालक हे फक्त वयाच्या वीस वर्षापर्यंत मुलांचे संभाळ करतात आणि पुढे त्यांना स्वतंत्र आयुष्य जगण्यासाठी मोकळीक देतात. परंतु आपल्याकडे मुलांप्रती असलेल्या पालकत्व हे त्याच्या जन्मापासून त्याचे शिक्षण त्याचं लग्न करून देणे तसेच ते नातवंड आणि त्यांच्या अखेरीच्या क्षणापर्यंत आई-वडील हे पूर्णतः मुलांचा संभाळ करण्यापर्यंत आपला आयुष्य घालवतात. परिणामी पालकांना मुलांप्रती विरोधात्मक व्यवहार बघावयास मिळतो. त्यामुळे पालकांनी हा दृष्टिकोन बाळगू नये की आपली मुलं हे आपल्याला आयुष्यभर सांभाळतील आणि मुलांनी असा हा आग्रह धरू नये आपले पालक आपल्याला आयुष्यभर सांभाळतील त्यामुळे वेळोवेळी या अँड्रॉइड जनरेशनची पाळे-मुळे ओळखून आपल्या व्यवहारांमध्ये योग्य तो बदल करणे गरजेचे आहे. तरच आपण संज्ञानी पालक किंवा सुज्ञानी मुलं-मुली म्हणून समोर येऊ शकु. भविष्याचा जर विचार केला तर सध्याचे अल्फा जनरेशन(2010 नंतर जन्माला आलेले) यांचा भविष्यकाळ कदाचित वाईट असु शकतो. 2040 नंतरच यांना आपल्या अस्तित्वाची खरी ओळख पटू लागेल, म्हणजेच आयुष्याची काही वर्ष गेल्यानंतरच. जास्त संपत्ती असलेला मुलगा किंवा मुलगी शोधण्याचा हट्टामुळे खुप मुला मुलींचे आयुष्य हे उध्वस्त झाले. लग्नाच्या दोन-तीन महिन्यातच त्यांना माहेरी परत येऊन घटस्फोटाकडे निर्णय वळवावे लागले. समाजामध्ये ही परिस्थिती का निर्माण झाली याचा आपण जर विचार केला तर आपल्याला असे समजते की फक्त संपत्ती आणि वैभव बघून जर आपण निर्णय घ्यायला लागलो, तर आपले निर्णय फसण्याची शक्यता ही जास्त असते. याउलट आपण जर बुमर जनरेशन म्हणजेच 80 च्या दशकामधील बालकांचा विचार केला तर त्यांनी विवाह किंवा आयुष्य स्तब्धतेसाठी घेतलेले निर्णय हे शांतपणे आणि भविष्याचा विचार करून घेतलेले दिसतात. कारण त्याकाळी घर नोकरी अशा कोणत्याही गोष्टीचा विचार न करता व्यक्तीची कर्तुत्व सिद्धता बघितली जायची. सध्याच्या मुला मुलींमध्ये कर्तृत्व सिद्ध करून दाखवण्याची क्षमता तर आहे परंतु कुठेतरी संस्कार कमी पडल्याचे आपल्याला दिसून येते. हेच संस्कार पालकांप्रतीही बदलल्याचे दिसते माध्यमांच्या जास्त आहारी गेल्यामुळे पालकांचं पाल्याकडे दुर्लक्ष कमी झाले आहे हे पालकांना मान्यच करावे लागेल. दर दहा वर्षाला बदलणाऱ्या करिअरच्या वाटा या आपल्याला कदाचित योग्य ठिकाणी नेऊ शकणार नाही परंतु आपल्याकडे असलेले संस्कार हे आपल्याला योग्य ठिकाणी नेण्यासाठी भाग पाडतात. शिक्षण हे उदरनिर्वाहाचे साधन नाही तर शिक्षण हे माणसाच्या मेंदूच्या विकासासाठी आणि बौद्धिक क्षमतांचा वाढीसाठी असते. त्यामुळे शाळेला पूर्वी जीवन शिक्षण विद्या मंदिर असं नाव होतं, परंतु आत्ता सध्या शिक्षणाकडे सर्रास आपण उपजीविकेचे किंवा गलेलठ्ठ पगाराची नोकरी कशी भेटेल या दृष्टिकोनातून बघत आहे. आणि हे संस्कार तुम्हाला पैसे देऊन घडवून आणता येणार नाही त्यासाठी मूल्य आधारित विचारांची जडणघडण ही त्या बालकावर बाल्यावस्थेपासूनच होणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यकाळ कसा असेल याची आपल्यासमोर उदाहरणे आहेच.



                             ‌