Sunday, June 9, 2024

ती


गावाच्या बाहेर फाटलेल्या छपराचं तिचं घर होतं, नवऱ्याच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी तिला वाळीत टाकून दिलं होतं. त्यादिवशी तिचा बाप तिच्या घरी आला होता आणि घराच्या बाहेर येऊन लोकांना मोठ्याने शिव्या देत होता, तो म्हणत होता की मला माहिती तुझा नवरा कसा मेला, घरगडी असलेल्या तुझ्या नवऱ्याला त्याच्या मालकाने मारले. अचानक ती म्हणते दादा थांबा, माझा नवरा कसा मेला हे मला माहितीय. लग्न करताना एवढा विचार नाही केला, मग आता कशाला एवढा विचार करताय, मी तुमच्यासोबत येणार नाही. मला माझ्या नशिबावर सोडून द्या. तिचा बाप म्हणतो,"अग बाई तू या दहा वर्षाच्या मुलाला घेऊन कशी राहणाऱ्या या फाटक्या घरात, परत चल माझ्यासोबत आपण जाऊ आपल्या गावाला.तिथेच राहू. अग तू एवढी एवढी असताना तुझी आई मला सोडून गेली, एका मुलीला काय पाहिजे असते मला कसं कळणार, आता तू हे लहान मुल आणि पोटात वाढणार पोरग घेऊन या फाटक्या छपरात कशी राहणार, चल". ती म्हणते,"नाही दादा, मला माझ्या नशिबावर सोडून द्या आणि तुम्ही या आता".

बाप गेल्यावर अनुराधा तिच्या दहा वर्षाच्या मुलाला म्हणते की, सोनू मला मदत करू लाग आपल्याला छप्पर झाकायचे. तेव्हा तिचा मुलगा म्हणतो की,"आई आपण आजोबांसोबत घरी का नाही गेलो". तेव्हा ती म्हणते, "अरे, बाबा दुसऱ्याच्या घरी सालगडी आहे त्याला त्याचाच पोट भरता भरता अवघड जातं मी कुठे त्याच्यावर ओझ बसू, शेवटी मुलगी हे परक्याचे धन असते. मला माझ्या बापाच्या डोक्यावरती ओझ नाही राहायचं आयुष्यभर".

आठवडाभर दोघं डोंगर रानातून लाकडं गोळा करून पालापाचोळा गोळा करून घराचे छप्पर कसे बस झाकतात. अनुराधा गर्भवती असते तरी घर चालवण्यासाठी पोटापाण्यासाठी ती काम करत असते. गवताची ओझी करून विकत असे, गवंड्याच्या हाताखाली कामाला जात असे, लाकुड तोडून विकत असे. सकाळी लाकुड तोडण्यासाठी गेलेली अनुराधा घरी येता येता संध्याकाळ व्हायची तेव्हा तिला एका मनाचे 50 पैसे भेटत होते त्यातून ती तिच्या मुलासाठी, खाण्यासाठी, उदरनिर्वाह करत होते. एकदा ती आजारी होती,खूप ताप आला होता तिला आणि काम करू शकत नव्हती त्यावेळेस खाण्यासाठी काही नव्हते म्हणून ती मुलाला घेऊन नदीतील मासे पकडायला उतरली.अंगात पारा वाढेल एवढा ताप पण पोटच्या मुलाचं पोट रिकामा त्यामुळे ती मासे पकडण्यासाठी पाण्यात उतरली आणि अचानक तिचा पाय घसरला, पण परत स्वतःला सावरत ती बुडता बुडता वाचली आणि किनाऱ्यावर आली. परंतु तिला मासा भेटला नाही. ती रात्र ती आणि तिचा मुलगा हे दोघेही उपाशी झोपले. सकाळी उठले तर अनुराधाने मुलाला मालकाच्या घरी पीठ मागण्यासाठी पाठवले. तर मालकिन बाईने रात्रीच्या चपात्या त्याला दिल्या. घरी आल्यानंतर तिच्या मुलाने आणि तिने त्या चपात्या घरात भाजी नसल्यामुळे पाण्यात ओल्या करून खाल्ल्या. असेच दिवस काढत काढत अनुराधाच्या पोटातील बाळ हळूहळू वाढू लागले. त्या रात्री अनुराधा आणि तिचा मुलगा सोनू हे दोघेही टेकडीच्या कठाडावर बसले होते आणि दुरून मंदिराजवळ चाललेल्या कीर्तन बघत होते. त्यावेळेस तिचा मुलगा म्हणतो की, "आई आपण कीर्तन जवळ जाऊन का नाही बघत?" तर मुलाला गावातील लोकांची असलेली मानसिकता आणि जातीव्यवस्था सांगण्यापेक्षा अनुराधा सांगते की, "अरे देव आपल्याला त्या मंदिरातूनच बघत आहे, त्याच्यामुळे आपल्याला तिकडे जाण्याची गरज नाही". कीर्तन संपता संपता रात्रीचे साडेअकरा वाजले होते आणि अचानक तिच्या पोटातील वेदना असह्य होऊ लागल्या, तिला कळा येऊ लागल्या, ती घरात गेली आणि जमिनीवर बसली त्या वेदना इतक्या असह्य होत्या की, तिचा मुलगा रडायला लागला. आई...... आई..... तर तिने तिच्या मुलाला बाजूने साडी लावण्यासाठी सांगितले आणि गावातून रखमा आजीला बोलून आण असं म्हटले. दहा वर्षाचा तिचा मुलगा सोनू हा रडत रडत अंधारात घाबरत परंतु धाडस करत पळत सुटला आणि रखमा आईच्या घरी पोहोचला. पण तिचा दारुडा नवरा तिला मारझोड करत होता. सोनू म्हटला, "आजी, आई खूप मोठ मोठ्याने रडते, तिचं पोट दुखतंय तू चल ना घरी.... आईने बोलावलं....चल‌ना तू लवकर...." तो‌ रडत होता. रखमा नवऱ्याला आडून सोनूला पुढे जायला सांगते. घरी जाणाऱ्या सोनू अचानक मंदिरासमोर थांबून हात जोडतो आणि आई बरी व्हावी म्हणून देवाकडे प्रार्थना करू लागतो, पण तेवढ्यात एक म्हातारा त्याला तिथून हाकलून लावतो. तो तसाच रडत...पळत.....हळूहळू धाडस करत घरापर्यंत अंधारातून पोहचतो. तोपर्यंत आईच्या वेदना अत्यंत असह्य झालेले असत्या, आणि सोनू रडत असतो दोघांसाठीही ही काळ रात्र खूप मोठी होती, आणि पहाट होता होता अनुराधा बाळाला एक जन्म देते. आणि सोनुला बाहेरून वीळा आणायला सांगते. अनुराधा त्यावेळी नाळ कापते अशक्त झालेले ती, उठणे बसू शकत नव्हती, जन्माला आलेले ते मुल अजून काही बोलत नव्हते तरी ती त्याला बोलण्याचा प्रयत्न करत होते दिवस उजेडतो तिच्या अंगातील अशक्तपणा दिसत होता परंतु त्या बाळाची कोणतीही हालचाल न झाल्यामुळे तिचा हंबरडा फुटतो आणि ते मुल मृत असतं....... काही वेळानंतर सोनू आणि अनुराधा हे दोघेही आकस्त होऊन एकमेकांच्या गळ्यात पडून रडता आणि ती सोनूला टेकडीवर एक छोटा खड्डा खोदण्यासाठी सांगते आणि त्यात त्या लहान मुलाला पुरून दोघेही पुन्हा आपल्या घरी परतता. रखमाआजी घरी येते तिच्या हाताला पट्टी बांधलेली असते, नवऱ्याने तिचा हात मोडलेला असतो, ती पण अनुराधा चा गळ्यात पडून रडू लागते, परंतु जवळ बसलेल्या सोनू हा निशब्द होऊन डोळ्यातून अश्रू वाहत असतात व मनात काहूर माजलेले असते. अनुराधाच्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या मृत्यूने ती

घायाळ झालेली असते आणि अचानक ती उंबऱ्यात जमिनीवरती कोसळते. रखमाआजी आणि सोनू हे दोघेही तिला उठवण्याचा प्रयत्न करतात...... मोठ्याने ओरडतात....... लहान सोनू तिचा हात हलवून तिच्या चेहऱ्याला हात लावून..... आई..... उठ..... आई......उठ.... माझ्याशी बोल....... म्हणून मोठ्या मोठ्याने रडू लागतोय...... आणि अनुराधाचा मृत्यू झालेला असतो. वाळीत टाकलेल्या त्या घरात अनुराधाचा मृत्यू झाल्याने तिचा मुलगा सोनूच्या पायाखालची जमीनच सरकते.

-एक_संकेत

No comments:

Post a Comment