Sunday, June 23, 2024

आणि आईस्क्रीम खाली पडली

आणि आईस्क्रीम खाली पडली




शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी नवी मुंबईला स्टेट बँकेत कामाला लागलो. घरापासून ऑफिसला जाण्यासाठी मला ऑटो, बस आणि ट्रेन या तीन साधनांचा उपयोग करावा लागत असे. साधारणता दोन अडीच तास लागत होते पोहोचण्यासाठी. दररोजचा प्रवास असल्यामुळे लोकलमध्ये माझे बरेच मित्र झाले होते, काहींची मैत्री एवढी झाली होती की जणू काही ते आता माझे परिवारातील सदस्यच वाटत होते. त्यामुळे सकाळी आम्ही जाताना आणि संध्याकाळी घरी येताना सर्व सोबतच असायचो. प्रत्येक जण आपापल्या कौटुंबिक गोष्टी माझ्यासोबत शेअर करायचा, मी पण त्यांना माझ्या सुखदुःखाच्या गोष्टी सांगत असायचो. असेच वर्षानुवर्ष चालली होती बाबांच्या जागेवर मी कामाला लागल्यामुळे आयुष्यात थोडी स्थिरता आली होती. माझ्यासोबत कामाला जाण्यासाठी एका कंपनीमध्ये कामाला असलेला प्रभाकर हा माझा मित्र झाला होता. त्याची आणि माझी चांगली मैत्री जमली होती. आम्ही दोघं जातानी येतानी खूप गप्पा मारायचं सकाळी साधारणतः आम्ही आठ वाजता घरातून बाहेर पडायचो आणि संध्याकाळी घरी येण्यासाठी आम्हाला आठ वाजत असे. म्हणजे आम्ही फक्त घरी जेवण आणि झोपण्यासाठी जात होतो. प्रभाकर त्याच्या दैनंदिन आयुष्यातल्या सर्व गोष्टी सांगायचा कामाचा त्याच्यावरती असलेला तणाव, कौटुंबिक जबाबदारी, मुलांचे शिक्षण, आर्थिक अस्थिरता यामुळे तो कंटाळून गेला होता‌. परंतु या परिस्थितीतही न डगमगता तो स्थिरपणे उभे राहण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे तो कंपनीत जॉब करूनही लोकल ट्रेनमधून ज्यावेळेस आम्ही सोबत असायचो त्यावेळेस तो ट्रेनमध्ये स्टेशनरी विकत असायचा. त्याच्यासोबत बॅगेमध्ये स्टेशनरी सामान नेहमी असायचं. तर मी त्याला विचारायचं की असं 5-10 रुपये कमवून तुझं भागत का रे? तर तो मला म्हणायचा की "इथून संध्याकाळी घरी गेल्यानंतरही, जेवण करून मी पत्नीच्या कामामध्ये मदत करतो". तो एका चाळीमध्ये राहत होता आणि माझ्या उतरण्याचे स्टॉप पासून त्याचं घर काही अंतरावर होतं. साधारणत पाऊण तास त्याला घरी जाण्यासाठी लागत असेल. त्याची बायको ही शिलाई मशीनवर कपडे शिवण्याचे काम करत असायची. मुलं साधारणता दहा वर्षाची असेल. त्यादिवशी ऑटोमधून उतरून ट्रेनची वाट बघत मी तिथे थांबलो होतो, आणि तेवढ्यात प्रभाकर आला मला म्हणाला, "अरे आज पण तेच झालं जेवायला वेळच भेटला नाही", त्यावर मी ओरडलो, "अरे काम किती असलं तरी जेवणाला प्रायोरिटी दिली पाहिजे". त्यावर तो बोलला की, "मालक रागावला होता त्यांनी अर्जंट काम मागितले होते ते पूर्ण करून देण्यामध्ये वेळ एवढा गेला की नंतर जेवणाची वासनाच उरली नाही". मग आम्ही दोघांनी सोबत पॅटीस खाल्ले आणि मग आम्ही घरी गेलो. तो नेहमी चिंताग्रस्त असायचा त्याविषयी त्याला जर विचारलं तर तो नेहमी बोलायचा की, "माझ्या एकट्यावर घराची जबाबदारी आहे, आई वडील दोघेही आजारी असतात, मुलांचे शिक्षण, बायको कशी तरी संसाराला मदत करत आहे पण ती बिचारी कधी माझ्याकडे एक रुपयाचीही अपेक्षा करत नाही. सर्व घर खर्च ते स्वतः चालवते. आणि माझ्या तटपुंजा पगारामध्ये मी माझं कुटुंब कसं चालवू." आपल्या पुरुषांचा आयुष्य असंच असतं आपल्याला कधीच मोकळे बोलता येत नाही, एखादी गोष्ट हवी असेल तर मागता येत नाही, कोणासमोर रडताही येत नाही किंवा हट्ट ही करता येत नाही, कदाचित यालाच प्रौढत्व व म्हणत असेल. "खरं सांगू आपलं बालपणच छान होतं, विनाकारण आपण मोठे झालो". नेहमी चिंताग्रस्त असल्यामुळे कदाचित त्याच्या शारीरिक स्थितीवर ही परिणाम झाला होता. मी कामावरून घरी आल्यानंतर माझं जे जीवन स्थिर चाललेल आहे, हे बघून मला कुतूहलता वाटत असे, की समाजामध्ये असलेल्या दुःखाची तुलना करता आपण किती आरामदायी जीवन अनुभवत आहे. असंच एक दिवस आम्ही स्टेशनवर ट्रेन ची वाट बघत उभे होतो आणि तेवढ्यात तिकडून गर्दी मधून पळत पळत प्रभाकर आला त्याच्या हातामध्ये आईस्क्रीम कोन होता. मी त्याला म्हटलं, "अरे बाबा लहान राहिला का तू आता आईस्क्रीम खायला". तर त्याने आईस्क्रीमचा एक घास खाल्ला आणि म्हटला की, "अरे बाबा आज काय सांगतो धावपळ, आज मालकाने जाम घाम काढलाय". अरे आमचा मालक असा आहे की तो बरोबर ऑफिस सुटण्याची वेळ झाली की, मग आम्हाला काम सांगतो आणि त्यामुळे माझा बाहेर निघण्याचा वेळ हा नेहमी मागे पुढे होत असतो. आणि आज त्याने मला जेवणाची सुट्टीच दिली नाही, तसाच बसलो मी मग काय म्हटलं आता घरी जाईपर्यंत भूक भागवण्यासाठी आईस्क्रीम खाऊ, तेवढीच एनर्जी भेटेल". दुसऱ्य दिवशी संध्याकाळी आम्ही सर्व स्टेशनवर जमलेलं असताना प्रभाकर आज लवकर आलेलो होत आणि तो बेंचवर बसला होता आज पण हातामध्ये आईस्क्रीम होती, पण तो काहीच बोलत नव्हता. आणि आईस्क्रीम खातही नव्हता. आईस्क्रीम वितळत चालली होती. खाली रेल्वे स्टेशनवर बसवलेल्या लादीकडे तो एकटक बघत होता. आईस्क्रीमचे ओघळ त्याच्या हातावरती आले होते. त्याची पापणीही हालत नव्हती. शेजारी त्याची बॅग होती जराशी जड वाटत होती मला वाटलं की दररोज त्याच स्टेशनरीचे सामान असतं विकण्यासाठीच ते असेल त्याच्यामध्ये, तेवढ्यात ट्रेन आली सर्व गर्दीचा लोंढा हा ट्रेन कडे वळायला लागला, त्याला म्हटलं चल रे प्रभा ट्रेन आली‌. त्याने कोणताही होकार नकार दिला नाही. मी त्याला हात लावला तर प्रभाकर तिथेच बेंचवर कोसळला आणि त्याच्या हातातील आईस्क्रीम खाली पडली. नंतर त्याला उचलून हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी प्रयत्न केला परंतु डॉक्टरांनी सांगितले की याचा मृत्यू झालेला होता, कदाचित हार्ट अटॅक मुळे. त्याच्या घरी मृतदेह सुपूर्द करून अंत्यविधी झाल्यानंतर माझ्या लक्षात आले की प्रभाकर ची बॅग तर माझ्याकडेच आहे अजून त्याच्या बॅगेला हात लावल्यानंतर जाणवले की जड लागते, तर बघितलं की त्याचा टिफिन त्यामध्ये तसाच होता त्याने दिवसभर जेवण केले नव्हते. कदाचित त्यासाठीच त्यांनी आईस्क्रीम घेतलेलं असावं, परंतु खाण्याअगोदरच ते खाली पडलं. रात्रभर त्याच्या निरागस मुलांचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर घोंगावत होता.

No comments:

Post a Comment