Friday, June 29, 2018

लोणार सरोवर

        
                लोणार  सरोवर 

       
                        बुलढाणा जिल्हा अजिंठा आणि सातपुडा पर्वताच्या कुशीत नयनरम्य नैसर्गिक सौंदर्याच्या कृपाछायेत विदर्भाच्या पश्चिम अंगाला विसावला आहे. विदर्भाचे महाद्वार म्हणून हा जिल्हा ओळखला जातो. राजमाता जिजाऊ माँ साहेबांचे माहेर आणि छत्रपती शिवरायांचे आजोळ असल्याने हा जिल्हा महाराष्ट्राचे मातृकुल म्हणून सुपरिचित आहे. आंतरराष्ट्रीय भूगर्भ शास्त्रज्ञांचे आकर्षण ठरलेले आणि जगातील एकमेव खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर याच जिल्ह्यात आहे.
ऐतिहासिक, पौराणिक, आध्यात्मिक, साहित्यिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला हा जिल्हा मराठी मनाचा आणि अस्मितेचा मानबिंदूच होय. आपण जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती घेऊ...पर्यटन स्थळे -लोणार- वैशिष्ट्य खाऱ्या पाण्याच्या विस्तीर्ण व नैसर्गिक सरोवराने बुलढाणा जिल्ह्यास आंतरराष्ट्रीय किर्ती मिळवून दिली आहे. 30 ते 50 हजार वर्षांपूर्वी झालेल्या अशनी पातामुळे सुमारे पावणे दोन किलोमीटर व्यासाचे आणि 10 ते 11 कि. मी. परिघाचे एक प्रचंड विवर तयार झाले आहे. लोणारचा उल्काघाती खळगा हा जगातील ज्ञात विवरामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा असून बेसॉल्ट खडकात निर्माण झालेले जगातील एकमेव विवर आहे. लोणारच्या सरोवराची प्राचीन साहित्यात पंचाप्सर सरोवर किंवा विराजतिर्थ या नावाने दखल घेतलेली आढळते. या सरोवराचा आणि परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने योजना आखली आहे.
पौराणिक आख्यायिकेनुसार ‘लवणासुर’ नावाच्या राक्षसाला विष्णूने मारले. त्याच्या नावावरूनच या सरोवरास व या परिसरास ‘लोणार’ नाव मिळाले. सरोवराच्या परिसरात दाट जंगल आहे. या जंगलात विविध पक्षी, माकडे, साप, सरडे, मुंगूस, कोल्हा, हरिण इत्यादी प्राणी पाहावयास मिळतात. येथील जंगलातील जैववैविध्य वाखाणण्याजोगे आहे.
सुविधा
लोणार येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे निवास संकुल आहे. तसेच खाजगी हॉटेल्सही आहेत. लोणार सरोवर शहरापासून 2.5 किलोमीटर अंतरावर आहे.

No comments:

Post a Comment